काळाचा क्रूर घाला! दुचाकी अपघातात पिंपळटक्का येथील अल्पभूधारक शेतकरी नितीन कदम यांची जीवनज्योत मालवली; गरीब कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

बातमी शेअर करा

वडवणी (बीड):बुधवार, दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने पिंपळटक्का परिसर सुन्न झाला आहे. पती-पत्नी दोघेही दुचाकीवरून जात असताना, काळाने अचानक झेप घेतली आणि झालेल्या भीषण अपघातात अल्पभूधारक शेतकरी नितीन तुळशीराम कदम यांची जीवनज्योत दुर्दैवीरित्या मालवली.अत्यंत गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीत शेतीची चिमुकली जमीन कसून संसाराचा गाडा हाकणाऱ्या या कुटुंबावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घराचा मुख्य आधार, रात्रंदिवस शेतात घाम गाळणारा कष्टकरी आणि कर्ता पुरुषच असा अचानक निघून गेल्याने संपूर्ण पिंपळटक्का गावावर शोककळा पसरली आहे.ज्या घरात कालपर्यंत हसते-खेळते वातावरण होते, त्याच घरात आज असा भयंकर आक्रोश पाहायला मिळत आहे की, पाहणाऱ्या कोणाच्याही डोळ्यातून अश्रू अनावर व्हावेत. गरिबी आणि संकटांशी दोन हात करत संसाराचे स्वप्न विणणाऱ्या एका निष्पाप शेतकऱ्याचा संसार असा अर्ध्यावरच उध्वस्त व्हावा, यापेक्षा दुसरं मोठे दुर्दैव ते काय असू शकते? नियतीने या कुटुंबावर केलेला हा घाला अत्यंत भयंकर आणि मन हेलावून टाकणारा आहे.काल घडलेल्या या दुर्दैवी अपघाताच्या आणि नितीन कदम यांच्या अशा अकाली एक्झिटच्या बातमीने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि या अत्यंत कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी त्यांच्या शोकाकुल कुटुंबाला हे अथांग दुःख सहन करण्याचे बळ देवो…भावपूर्ण श्रद्धांजली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *