
धारूर-तेलगाव महामार्गावर आज एक मोठी दुर्घटना टळली आहे. प्रवाशांनी भरलेली एक इलेक्ट्रिक (चार्जिंग) बस नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याशेजारील खोल खदाणीत कोसळली. सुदैवाने, अपघात घडताच स्थानिक चोरांबा गावातील नागरिकांनी दाखवलेल्या अचाट धैर्यामुळे आणि तत्परतेमुळे सर्व प्रवाशांचे प्राण सुरक्षित असून, मोठी जीवितहानी टळली आहे.
नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, धारूर-तेलगाव हायवेवरून प्रवास करत असताना ही इलेक्ट्रिक बस अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. पाऊस आणि निसरड्या रस्त्यामुळे बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीझुडपांना तोडत एका खोल खदाणीमध्ये जाऊन अडकली. बसचा वेग आणि खदाणीची खोली पाहता मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळळ उडाली आणि ओरडाओरड सुरू झाली.
चोरांबा गावचे तरुण ठरले देवदूत!अपघात घडल्याचे समजताच अवघ्या ५ मिनिटांच्या आत चोरांबा गावातील स्थानिक तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून आले. मुसळधार पाऊस सुरू असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या युवकांनी तात्काळ बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरू केले.
ग्रामस्थांच्या या तातडीच्या मदतीमुळे सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.तातडीने रुग्णवाहिका पाचारण प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेला (ॲम्बुलन्स) फोन करून पाचारण केले. सर्व प्रवाशांना प्रथमोपचारासाठी आणि पुढील तपासणीसाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भरपावसात आणि संकटाच्या अत्यंत कठीण प्रसंगात चोरांबा गावातील नागरिकांनी दाखवलेल्या या सामाजिक भान आणि तत्परतेचे संपूर्ण परिसरातून जोरदार कौतुक होत आहे. ‘माणुसकी अजूनही जिवंत आहे’, याची प्रचिती या घटनेने पुन्हा एकदा आणून दिली आहे.ताज्या आणि सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा – ‘आयटी कदम बातमी आणि विचार


